Friday, October 12, 2012

बेळगाव चे बेळगावी झाले,महाराष्ट्रात तोडफोड करून राजकीय पक्षांना काय मिळाले?


फितूरीचा शाप मराठीजनांना इतिहासकालापासून आहे.आपल्या बांधवांना मदत न करता त्याचे पाय ओढत राहणे ही खेकड्याची प्रवृती मराठी लोकांमध्ये जास्त प्रमाणात आढळते.

काल परवाचे बेळगावचे उदाहरण यासाठी उत्तम आहे.मराठी माणसांच्या हितासाठी एकत्र न येता प्रत्येक पक्ष आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलत होता.मिडीयासमोर गाजावाजा  करून राष्ट्रपतींना पत्र पाठविणे किंवा नुसत्याच डरकाळ्या फोडत महाराष्ट्रात बसून राहणे हे फक्त लोकांच्या डोळ्यात धूळ टाकण्यासाठीच आहे.

या राजकारणी लोकांना खरोखरच जर सीमाभागातील जनतेची काळजी वाटत असती तर सर्वपक्षीय मंडळीनी राष्ट्रपतींना भेटून आपली एकी दाखविली असती.महाराष्ट्रात बंद करून व महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या मालमत्तेचे नुकसान करून राजकीय पक्षांनी काय साधले तेच कळत नाही.कोल्हापूरातील एक बोलके उदाहरण यासाठी पुरेसे आहे,बंद दिवसी ग्रामीण भागातून शहरात भाजीपाला विकण्यास आलेल्या एका वृध्द आजीचा भाजीपाला विस्कटण्यास या मंडळीना पुरूषार्थ वाटतो.विधानभवनाचे उद्घाटन बेळगावाला चालू असताना काही लोक आपल्याच बांधवांना नुकसान पोहचवत होते.नक्की यांचे आंदोलन कुणासाठी चालू आहे हेच कळत नाही.

सत्ताधारी पक्षाची स्थिती तर यापेक्षा वेगळी नाही.वेगवेगळी वक्तव्ये करून महाराष्ट्रातील आणि सीमाभागातील जनतेला मुर्ख बनविण्यात हे लोक वाकबगार आहेत.सीमाभागातील जनतेसाठी या सर्वपक्षीय लोकांना खरोखरच काही करावयाचे असेल तर या लोकांनी दिल्लीत विशाल मोर्चा काढून मराठीजनांची एकजूट दाखविली असती.पण सर्वच पक्षांना मताच्या लाचारीसाठी हा विषय चघळत ठेवायचा आहे असे एकंदरीच त्यांच्या वर्तनावरून वाटते.

जनतेच्या सहनशीलतेचा या लोकांनी जास्त अंत पाहू नये नाहीतर एक दिवस जनताच हाती मशाल घेऊन राजकारणी लोकांना धडा शिकवेल.  

Thursday, October 4, 2012

पैसा पाण्यात गेला


महाराष्ट्र राज्य प्रगतशील आहे असे म्हटले जाते पण महाराष्ट्रात प्रगती फक्त उद्योगपतींची होते आहे.महाराष्ट्राशी नाळ जोडलेला शेतकरी यापासून दूरच आहे.

देशातील सर्वाधिक आत्महत्या आज महाराष्ट्रात होतात,हे आपल्यासाठी खूपच लाजीरवाणे आहे.गडचिरोली,मेळघाट सारख्या ठिकाणी कुपोषणाच्या समस्या आहेत,त्यातच नक्षलवादाची भर आहे.विदर्भात तर कायमच दुष्काळी  परिस्थिती असते.महाराष्ट्राची प्रगती नक्की कशाच आहे हेच कळत नाही.

आज महाराष्ट्रात सर्वात जास्त पैसा जलसिंचनाच्या योजनेसाठी खर्च होतो.काही योजना तर दोन-तीन दशके चालू आहेत.काही कोटीचा खर्च हजारो कोटीवर जातो.यामधील फायदा कंत्राटदार,सरकारी अधिकारी तसेच राजकारणी लोकांत विभागला जातो.सदोष योजनेमुळे धरणातून होणाऱ्या पाणी गळतीचे प्रमाण तर खूपच लक्षणीय आहे.

धरण परिसरात टुमदार बंगले बांधून राहणाऱ्या अधिकारी,राजकारणी लोकांना  सर्वसामान्य  जनतेचे अश्रू दिसत नाहीत.धरणे जनतेसाठी नव्हे तर कंत्राटदार,सरकारी अधिकारी तसेच राजकारणी लोकांसाठी बांधली जातात असे आता खरोखरच वाटू लागले आहे.

नदीजोड योजना राबवून दुष्काळी परिस्थितीवर मात करणे शक्य आहे.पण जनतेचा पैसा पाण्यात वाहून गेला तरी सरकारला अजून जाग आलेली नाही.