Thursday, August 25, 2011

छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजीराजें यांचे निष्ठावंत मुस्लिम सेनानी

छत्रपती शिवरायांचा लढा मुस्लीम धर्माविरूध्द नसून जुलमी इस्लामी राजसत्तेशी होता,दुर्दैवाने आज शिवरायांच्या नावाचा वापर हिंदू-मुस्लीम असे दंगे घडविण्यासाठी होतो.आपण सर्वांनी खरा इतिहास समजून घेतला पाहिजे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात धर्माला स्थान नव्हते.छत्रपती शिवरायांनी अफजलखानाचा वध केला पण त्याची समाधीही प्रतापगडाच्या पायथ्याला बांधली.काही अतिविद्वान इतिहासकारांनी,ज्यांनी आपल्या इतिहास लेखनात संभाजीराजेंची बदनामी केली,अशा इतिहासकारांनी संभाजीराजेंच्या मृत्युचे भांडवल करून संभाजीराजेंनी हिंदू धर्मासाठी प्राण सोडिला असे लिहून संभाजीराजेंना धर्मवीर ठरविले.ज्याला इतिहासात कोणताही पुरावा नाही.वास्तविक छत्रपती संभाजीराजेंनी स्वराज्यासाठी बलिदान केले होते.छत्रपती शिवराय,छत्रपती संभाजीराजें यांना धर्माच्या बंधनात अडकवून काही राजकारणी मंडळी व इतिहासकार त्यांचे महत्व कमी करत आहेत.आज महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील लढ्यात छत्रपती शिवरायांचे नाव वापरून ही मंडळी छत्रपतींना महाराष्ट्रात बंदिस्त करू पाहात आहेत,या मंडळीना माहीत नाही की कर्नाटक ही मराठ्यांची जहागीर होती.छत्रपती शिवराय,छत्रपती संभाजीराजें यांच्या सैन्यात अनेक निष्ठावंत मुस्लीम सैनिक होते,याची माहिती आपण पुढे सविस्तरपणे घेणार आहोत.

छत्रपतींच्या जीवाला जीव देणारे अनेक मुस्लिम सरदार स्वराज्यात होते.नूरखान बेग हा पायदळाचा प्रमुख होता.सिद्दी अंबर वहाब हवालदार याने(जुलै १६४७)मध्ये कोंढाणा सर करताना मोठा पराक्रम गाजवला.सिद्दी इब्राहिम हा छत्रपती शिवरायांचा अंगरक्षक होता,अफजलखानाच्या भेटीच्या वेळी तो छत्रपती शिवरायांचा अंगरक्षक होता(१९ नोव्हेंबर १६५९),फोंड्याचा लढाईवेळी त्याने पराक्रम गाजविला(एप्रिल १६७५)आणि त्यावर स्वराज्याचे निशाण फडकावले.सिद्दी हिलाल हा घोडदळात अधिकारी होता,पन्हाळगडाच्या वेढ्यात(२ मार्च १६६०)त्याने शिवरायांच्या सुटकेसाठी मोठा पराक्रम गाजविला,तसेच उमराणीजवळ बहलोल खानाविरूध्द झालेल्या लढाईत(१५ एप्रिल १६७३)तो होता.नेसरीजवळ बहलोल खानाशी झालेल्या युध्दात प्रतापराव गुजराबरोबर मारल्या गेलेल्या सात वीरात सिद्दी हिलाल होता.

सिद्दी वाहवाह(सिद्दी हिलालचा पुत्र)हा घोडदळातील सरदार होता,पन्हाळगडाला सिद्दी जोहरशी झालेल्या लढाईत तो जखमी झाला(दि.२ मार्च १६६०).मदारी मेहतर हा छत्रपतींचा विश्वासू सेवक होता.आग्र्याच्या बंदोबस्तातून महाराजांना सुटतेवेळी याची मोठी मदत झाली(१७ ऑगस्ट १६६६).काझी हैदर हा छत्रपती शिवरायांचा वकील होता(सन १६७०-१६७३).हुसेनखान मियाना याने मसौदखानाच्या कर्नाटकातील प्रांतावर हल्ला करून बिळगी, जामखिंड, धारवाड आदि प्रांत जिंकला(मार्च १६७९).रुस्तमेजनमा हा महाराजांना विजापूर दरबाराच्या गुप्त बातम्या पाठवण्याचे काम करीत असे,हुबळीच्या लुटीच्या वेळी त्याने मोठी कामगिरी पार पाडली(६ जानेवारी १६६५).दर्यासारंग हा मराठी आरमाराचा पहिला सुभेदार होता.त्याने मायनाक भंडारीसोबत खांदेरीवर(सन १६७९)विजय मिळवला.तर संभाजीराजेच्या कालात बसनूर(जानेवारी-फेब्रुवारी १६८५) लुटले. दौलतखान, इब्राहीम खान,सिद्दी मिस्त्री या आरमारातील अधिकार्‍याने खांदेरी(१६७९) आणिसंभाजीराजेंच्या बसनूरच्या(जानेवारी-फेब्रुवारी १६८५)मोहिमेत मोठा पराक्रम केला.सुलतान खान हा सुभेदार पोर्तुगीजांकडून दारुगोळा मिळवण्यात यशस्वी झाला होता.इब्राहिम खान हा मराठ्यांच्या तोफखान्याचा प्रमुख होता.त्या काळात तोफखान्यातील सर्व गोलंदाज (तोफची) मुस्लीम होते.विजापूर आणि गोवळकोंड्यावरुन स्वराज्यात आलेल्या ७०० पठाणी पायदळ आणि घोडदळाने स्वराज्याची निष्ठापूर्वक सेवा केली.

छत्रपतीच्या काळात असे अनेक निष्ठावंत मुस्लीम सैनिक होते ज्याची माहिती आपणास ज्ञात नाही.हे लिहिण्याचे प्रयोजन एवढ्याचसाठी की आपण छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजीराजेंना धर्माच्या बंधनात,भाषेच्या बंधनात अडकवून,या राष्ट्रपुरूषांचे महत्व कमी करू नये.छत्रपतींचे विचार आपण आचरणात आणावेत.त्यांच्या विचारांशी प्रतारणा करू नये.