Thursday, May 19, 2011

रायगडची चढाई (एक विस्मरणीय अनुभव)

रायगडाला जाण्यासाठी पुण्यातून आम्ही सकाळी निघालो.पण सुरूवातच अडचणीने झाली.मी,चेतन,संकेत,राम,मयुर,योगेश अंगडी, योगेश कुलकर्णी,सुहास,सुशील असे आम्ही नऊ जण होतो आणि गाडी छोटी होती.शेवटी ड्रायव्हरने एक टाटा सुमो मागवली ऊपर आम्हास सांगितले की गाडी नवीन आहे.आम्ही सर्वजण छोट्या गाडीतून चांदणी चौकात आलो.नऊ वाजून गेले तरी गाडीचा पत्ता नाही.शेवटी गाडी आली,पण गाडी बघितल्यावर सर्वांनाच डोक्यावर हात मारून घ्यायची वेळ आली.टाटा सुमो गाडी जूनी खटारा होती,गाडीच्या सिट फाटलेल्या होत्या.गाडीमध्ये म्युझिक सिस्टिमची सोय नव्हती.पण आता वेळ निघून गेलेली होती.रायगडाला जावयाचे म्हणून आम्ही लोकांनी भरपूर खरेदी केली होती.शेवटी आम्ही खटारा टाटा सुमो मधून रायगडाला जावयाचा निर्णय घेतला.

क्षणभर विश्रांती
पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ,वाटेत थांबत-थांबत आमचा प्रवास चालू होता.वाटेत एका  जलाशयाजवळ थांबून मस्तपैकी गरमा-गरम भजी खाल्ली.कोल्हापूरचा म्हणून सर्वांनी मला मिरची खाण्याचा आग्रह केला,मी पण जरा जास्तच मोठे पणा दाखवून तीन-चार मिरच्या खाल्ल्या पण नंतर माझी अवस्था पाहण्यासारखी झाली.थोडीशी पेटपूजा झाल्यानंतर आमचा प्रवास परत चालू झाला.ताम्हीनी घाटामध्ये धबधब्या खाली सर्वांनी आंघोळ करून घेतली.नंतर वाटेत माणगावला सर्वांनी मस्तपैकी जेवण घेतले.असे करत शेवटी आम्ही महाड मार्गे रायगडाच्या पायथ्याला सायंकाळी पाच वाजता पोहचलो.रायगडावर चालत जावयाचे व येताना रोपवेने यावयाचे असे आमचे ठरले.रायगडाच्या चढाईला सुरूवात करताना मुसळधार पावसाने व दाट धुक्याने आमचे स्वागत केले.हर हर महादेव,छत्रपती शिवाजी महाराज की जय असे म्हणून आम्ही चढाई आरंभिली.छत्रपतींचे नाव घेतल्यावर सर्वांच्या अंगात वीरश्री संचारली होती.                                                          


चढाईला सुरूवात
शिवरायांना वंदन करून आम्ही सर्वांनी सुरूवात केली.थोडेसे अंतर पार केल्यावर रायगडाच्या  बुलंदपणा लक्षात येऊ लागला.एका बाजूस खोल दरी तर दुस-या  बाजूस उंच अशी  डोंगराची भिंत, वर जाण्यासाठी असलेल्या दगडी मजबूत पाय-या सारेच काही औरच होते.दाट धुके तसेच मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे वाट खूपच निसरडी झाली होती.मी दोन वेळा घसरून पडलो.छत्रपतींच्या नावाचा जयघोष करत आम्ही मावळे मार्गक्रमण करत होतो.वाटेत अनेक ठिकाणी आम्हांस धबधबे पाहावयास मिळाले.रायगडाच्या बुलंद व अजिंक्य असणा-या कड्यावरून फेसाळत पडणा-या धबधब्याचे सौंदर्य केवळ अर्वणीय असे होते.कोसळणा-या जलधारेमध्ये स्नान करण्याचा मोह परत एकदा सर्वांना झाला.आंघोळीनंतर एका आडोशाला बसून आम्ही सर्वांनी सोबत आणलेले खाद्यपदार्थ खाऊन थोडीशी विश्रांती घेऊन परत एकदा चढाई चालू केली.या चढाईचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे आमच्या सोबत एक कुत्रा पायथ्यापासून आला होता,त्याचे नाव मयुरने शेरू असे ठेवले होते.त्याला आम्ही सोबतचे खाद्यपदार्थ खावयास दिले.शेरू रायगड किल्याच्या तटापर्यंत आमच्या सोबत होता जणू काही आम्हास रायगडाचा रस्ता दाखवत होता.      


तटबंदीवरून कोसळणारे धबधबे
सायंकाळचे साडेसहा वाजून गेले होते.वाटेतील फेसाळणारे धबधबे,हिरवेगार डोंगर,दुरून दिसणारा रायगडाचा मुख्य दरवाजा सारेच आम्हास खुणावत होते.रायगडाने आम्हांस अशी मोहिनी घातली होती की रायगडाचे प्रत्येक रूप साठवत आम्ही डोळ्यात साठवत होते.किती वेळ झाला याची कुणास फिकिर नव्हती. अखेरीस तो क्षण जवळ आला आणि आम्हास दोन प्रचंड अशा बुलंद दरवाज्याचे दर्शन झाले. हाच तो दरवाजा ज्याने शत्रूच्या आक्रमणाशी मुकाबला करून मराठ्यांच्या राजधानीचे रक्षण केले.हिरोजी इंदूलकर या शिवरायांच्या स्थापत्यकाराने खरोखर अजिंक्य असा पहाड किल्ल्याच्या प्रवेशदारी  उभा केला होता. याचे वर्णन शब्दात करणे केवळ अशक्य ,दाट धुक्यात न्हाऊन निघालेल्या या 
महादरवाज्याचे दर्शन
दरवाज्याजवळ आम्ही सर्वजण वेड्यासारखे कितीतरी वेळ बसून होते.पाऊसामुळे  सर्वजण नखशिखांत भिजलो होतो.पण कुणाला याची पर्वा नव्हती,छत्रपतींचा जयजयकार करीत आम्ही मुख्य दरवाज्यातून आत प्रवेश केला, त्या आवाजाच्या प्रतिध्वनीने आमच्या सर्वांच्या भिजलेल्या शरीरावर सुध्दा काटा आणला.तो क्षण आजही विसरू शकत नाही.विचार केला,याच दरवाज्याजवळ कित्येक लढाया झाल्या व   छत्रपतींचे आगमन  रायगडावर याच मार्गे येत होते.

तटबंदीवर मावळ्यांची विश्रांती
दरवाज्यातून वर आल्यानंतर सर्वांनी एका झोपडीवजा हॉटेलमध्ये गरमागरम चहा घेतला व छोटेसे ताजतवाने झालो.नंतर बराच वेळ रायगडाच्या कट्टावरून बसून आम्ही रायगडाला डोळ्यात साठवत होतो.सायंकाळचे सातेसात वाजून गेले होते,अंधार वेगाने पडत होता वर दाट धुके,सोबतीला मुसळधार पाऊस व सोसाट्याचा वारा आम्ही लवकरात लवकर गेस्ट   रूम मध्ये पोहचण्याचा विचार केला.पण वेळ   
लवकर जात होती.आम्ही होळीचा माळ या परिसरात पोहचलो.होळीचा माळ परिसरात असलेला छत्रपतींचा पुतळा अंधुकसा दिसत होता.सर्वजण रायगड रोपवेच्या गेस्ट रूम कडे जाण्याचा रस्ता शोधत होते.पण रस्ता सापडत नव्हता,वर मुसळधार पाऊसामुळे सर्वजण गारठलो होतो.बराच वेळ आम्ही राजसभा,होळीचा माळ याच परिसरात भटकत होतो.आमच्याकडे दोन बॅट-या होत्या पण त्याचा काही उपयोग होत नव्हता.कारण इतके दाट धुके होते,की अगदी जवळचे दिसत नव्हते ,शेवटी आम्ही महादरवाज्याजवळ  थांबण्याचा निर्णय घेतला.  आठ वाजून गेले होते,सर्वांची अवस्था बिकट

रायगडावर रस्ता शोधणारे मावळे 
झाली होती,एकतर सर्वजण नखशिखांत भिजले होते वर सोसाट्याचा वारा ,मुसळधार पाऊस व दाट धुके सोबतीला होते.बराच वेळ निघून गेला साडेआठ वाजून गेले,गडावर पुरातत्व खात्याचे कर्मचारी आम्हास सुरूवातीला भेटले होते,परत माघारी येऊन आम्ही त्यांचा शोध घेतला,शेवटी तो कर्मचारी आमचा आवाज ऐकून आमच्या दिशेने आला.त्याला आम्ही आमच्या परिस्थितीची कल्पना दिली.त्याने आम्हास रोपवेच्या गेस्ट रूम कडे नेण्याचे कबूल केले.
आमची कोंदट रूम
अखेर आम्ही गेस्ट रूम मध्ये पोहचलो.त्या कर्मचा-याला शंभर रूपये देऊन आम्ही त्याचे आभार मानले.गेस्ट रूम पाहिल्यावर सर्वजण उडालेच,अतिशय कोंदट अशी जागा वर पत्र्याचे शेड पण आमच्याकडे इलाज नव्हता. आम्हा सर्वांनी, सामान ठेऊन,कपडे बदलून गेस्ट रूमच्या उपहारगृहामधील पिठलं-भाकरी खाल्ली ज्याची ऑर्डर चढाई चालू करण्यापूर्वी आम्ही दिली होती.पेटपुजा झाल्यानंतर ऑफिसमधल्या गप्पा-गोष्टी करून सर्वांनी वामकुक्षी करण्याचा निर्णय घेतला कारण सर्वजणच खूप थकले होते.मुसळधार पाऊस पत्र्याच्या शेडावर पडत असल्यामुळे आवाज जोरात येत होता याउपर सोसाट्याचा वा-याचा आवाज त्यामुळे झोप काही येत नव्हती,ब-याच वेळानी झोप लागली.मध्यरात्री जाग आली म्हणून मी टॉर्चचा प्रकाश मारला तर धक्काच बसला,उंदीर मामा आमच्या सर्वांच्या अंगावर निवांतपणे खेळत होते.उंदरामुळे मला रात्रभर झोप लागली बाकीचे कसे झोपले देव जाणे.पहाटे-पहाटे मला डोळा लागला.
राजसभेतील छत्रपतींचा पुतळा
सकाळी उठल्यावर सर्वांना उंदराचे प्रताप कळाले.संकेतला उंदीर चावला होता,त्यामुळे त्याचा पाय थोडासा सुजला होता.संकेत व मयुरची पॅंट व बॅगा उंदराने कुरतडल्या होत्या.तर रात्रभर मला झोप न लागल्यामुळे माझ्या डोळ्यात रक्त आले होते.आंघोळ केल्यानंतर चहा घेऊन रेनकोट घालून आम्ही बाहेर पडलो कारण बाहेर मुसळधार पाऊस पडत होता.एक गाईड ठरवून आम्ही किल्ला पाहावयास सुरूवात केली.मुसळधार पाऊस,सकाळचे आल्हाददायक वातावरण व दाट धुक्यामुळे गडाचे सौंदर्य वेगळेच भासत होते.दाट धुक्यात हरवलेल्या दगडी इमारती,पावसामुळे ठिकठिकाणी उगविलेले हिरवेगार गवत याचे वर्णन काय करावे.गाईड तरूण असल्यामुळे जास्त उत्साही होता.रायगडावरील एकेक प्रसंग सांगताना तो हरवून जाई.राजसभेतल्या छत्रपतींच्या पुतळ्याचे दर्शन करून आम्ही महादरवाज्यातून बाहेर पडलो.होळीच्या माळ परिसरातील छत्रपतींच्या पुतळ्याजवळ बसून त्याकाळतील प्रसंग आठवू लागलो.

छत्रपतींची समाधी
याच परिसरात छत्रपतींवर हल्याचा प्रयत्न झाला होता. बाजारपेठ, राणीमहाल, नगारखाना, गंगासागर तलाव आदि ठिकाणे पाहून आम्ही जगदीश्वराच्या मंदिराजवळ आलो. जगदीश्वराच्या मंदिरात छत्रपतींच्या नावाचा जयजयकार करून आम्ही छत्रपतींच्या समाधी जवळ येऊन आपला माथा टेकला.याच ठिकाणी आम्ही बराच वेळ बसून होता. जगदीश्वराचे मंदिराच्या बाहेरील हिरोजी इंदूलकराचा शिलालेख पाहून आम्ही गाईडच्या घरी गेलो.त्याने आम्हास गरमागरम भजी व चहा दिला.त्याचे पैसै देऊन आम्ही गेस्ट रूम वर परत  आलो.सोबतच्या बॅगा घेऊन रायगडावर परत येण्याचा निर्धार करून आम्ही रोपेवेत बसलो.रोपवेने येतेवेळी आम्हास विराट अशा रायगडाच्या दरीचे दर्शन झाले.येतेवेळी रोपवेतूनच छायाचित्रे घेत शेवटी आम्ही रायगडाचा पायथा गाठला.व खटारा टाटासुमो मध्ये बसून पुण्याच्या दिशेने धावू लागलो.

   

1 comment: