Thursday, July 19, 2012

भारताचे कचखाऊ परराष्ट्रीय धोरण

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताचे परराष्ट्रीय धोरण अगदी कीव करण्याजोगे आहे.

इवलासा पाकिस्तान आपला फणा काढून नेहमीच  फुरफूरत असतो.पूर्वेच्या व उत्तरेच्या सीमा चीन गिळंकृत करत आहे.

पूर्वकडे बांग्लादेशीयांचे लोंढे वाढत आहेत.आपण मात्र प्रत्येक वेळी सहिष्णूतेचे धोरण अमलात आणूऩ डोळ्यावर कातडी पांघरून बसलो आहे.

परकीयांच्या आक्रमणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे दिल्लीचे राजसिंहासन पृथ्वीराज चौहानाच्या ताब्यातून जाऊन परकीयांच्या ताब्यात आले .हीच चूक आपण परत एकदा करतो की काय याची भीती वाटत आहे,आता दिल्लीच नाही तर संपूर्ण देशातच असुरक्षित वातावरण आहे.आज देशात सर्वसामान्य नागरिक,महिला सुरक्षितपणे रस्त्यावर फिरू शकत नाहीत.

समोरासमोर युध्द करता येत नसल्यामुळे चीन पाकिस्तान ,नेपाळचा वापर आपल्याविरूध्द करत आहे.नेपाळची राजेशाही संपवून माओवादी सत्ता आणण्यास चीनच कारणीभूत आहे.

आज भूतान सारख्या छोट्या देशावर त्याची नजर आहे.भूतानमध्ये मार्क्सवादी विचारसरणीच्या पक्षाचे प्राबल्य वाढत आहे.जी गोष्ट नेपाळमध्ये केली तीच चीन भूतान मध्ये करू पाहात आहे,पण आपल्या राजकर्त्यांच्या नजरेत ही गोष्ट कधी येणार हेच कळत नाही.   

चीनने पोसलेला  लाल नक्षलवाद तर आपल्या दारात आहे.याला आपण वेळीच ठेचले नाही तर उद्या आपलीही अवस्था बिकट होणार आहे.दरवेळी अमेरिकेकडे आशाळभूत नजरेने पाहण्यात काहीच उपयोग होणार नाही.इस्त्रायल सारखे आक्रमक धोरण अवलंबून आपण परकीय तसेच नक्षल्यांचा कायमचा बंदोबस्त  केला पाहिजे.

आपले परकीय धोरण बदलायची वेळ येऊन ठेपलेली आहे.


Monday, December 19, 2011

दिल्लीच्या तख्तावर परत एकदा मराठ्यांनी चाल करून जाण्याची वेळ आली आहे.

गेल्याच आठवड्यामध्ये कर्नाटक सरकारने बेळगाव महानगरपालिका विर्सजीत केली.सीमाभागातील मराठी बांधवावर गेली पन्नास वर्ष अत्याचार होत आहे.पण प्रत्येक वेळी केंद्रातील सरकारने आपले हित जोपासत विलीनीकरणाचा विषय लांबविला.

सीमाभागातील मराठी जनतेची परिस्थिती मोठी बिकट आहे.त्यांना धड कर्नाटकात नोकरी मिळते ना महाराष्ट्रात मिळते.मराठी तरूणांना खोट्या गुन्ह्याखाली तुरूंगात अडकवून कर्नाटक सरकार त्यांचा छळवाद मांडते.महाराष्ट्र सरकारने सीमाभाग केंद्रशासित करावा म्हणून ठराव केला पण नुसता ठराव करून काहीच होणार नाही तर हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीमध्ये दिल्लीत महाराष्ट्रातील लाखो लोकांनी विशाल मोर्चा काढून सरकारला आपली ताकद दाखविली पाहिजे.दिल्लीच्या तख्तावर परत एकदा मराठ्यांनी चालून जाण्याची वेळ आली आहे.

सीमाभागातील दोन पिढ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला,आता तिसरी पिढी जन्माला आली आहे,त्यांच्या भवितव्यासाठी तमाम मराठी जनांनी एक होण्याची वेळ आली आहे.
इतिहास सांगतो जेव्हा मराठी एक झाले तेव्हा त्यांनी दिल्ली काबीज केली.मराठी जनांनी एकत्र येवून हा लढा अधिक तीव्र केला तरच बेळगाव,कारवार,निपाणी,हुबळीसह संयुक्त महाराष्ट्र होऊ शकतो....
यावेळी मला कवीवर्य राजा बढे यांच्या पंक्ती आठवितात.

                   काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी,
                   पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी,
                   दरिद्र्याच्या उन्हात शिजला,
                   निढळाच्या घामाने भिजला,
                   देशगौरवासाठी झिजला,
                   दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा,गर्जा महाराष्ट्र माझा ।।            
 

Thursday, November 3, 2011

टीम अण्णांचे भरकटत चाललेले आंदोलन

भष्ट्राचार विरूध्दच्या अण्णांच्या आंदोलनात सारा देश स्वंयस्फुर्तीने एकत्र आला.स्वातंत्र्यलढ्यानंतर सर्वाधिक लोकांनी भाग घेतलेले हे मोठे जनआंदोलन होते.

या आंदोलनाला मिळालेल्या यशाने या टीममधील इतर लोक सध्या भरकटून गेले आहे.किरण बेदी,केजरीवाल,प्रशांत भूषण ही मंडळी त्यापैकीच एक होत.

या प्रत्येक मंडळीच्या सामाजिक संस्था(N.G.O.)आहेत.या मंडळीच्या एकंदरीत वर्तनावरून आपल्या संस्थेला या आंदालनाचा किती फायदा होईल यावर ही मंडळी सध्या लक्ष देत आहेत.सोशल मिडियामध्ये वेगवेगळी वक्तव्ये करून या मंडळीनी आंदोलनाची धार बोथट करून टाकली आहे.

टीम अण्णांमधील या मंडळीना आपल्या कार्यपध्दतीत सुधारणा केली नाही तर भष्ट्राचारविरूध्दच्या जनआंदोलनाची स्थिती समुद्राच्या वादळात भरकटलेल्या जहाजासारखी होण्यास वेळ लागणार नाही.    

Tuesday, October 18, 2011

भारतातील तथाकथित मुर्ख बुध्दिवादी

आजकाल लोकांना थोडी प्रसिध्दि मिळाली की व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही ओकायला ते  सुरूवात करतात.भारतातील काही तथाकथीत समाजसेवी मंडळी आहेत जे समाजसेवेच्या नावाखाली(N.G.O)आपले दुकान चालवतात.एखादा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला की यांना गगण ठेंगणे वाटू लागते.भारतात आपणच बुध्दिवादी आहोत हा मुर्ख भ्रम मनात ठेवून भारताच्या सार्वभौमत्वाला,आंतरराष्ट्रीय हिताला बाधा पोहचणारी विधाने ते करतात.

काश्मीर प्रश्न,पूर्वेकडील प्रश्न,नक्षली चळवळी यांच्याबदल या लोकांना खूप कळवळा आहे.आंतरराष्ट्रीय संस्था या लोकांना मदत करून यांचा वापर भारतविरोधी कारवायाकरिता करतात.  

या मुर्ख लोकांना महत्व देऊन आपली मिडिया त्यांना आणखी मोठे बनविते.या तथाकथित समाजसेवी लोकांना आपण आता किती महत्व द्यावयाचे हे ठरविण्याची वेळ आता आजच्या पिढीवर आली आहे.आपण वेळीच या लोकांपासून सावध झालो नाही,तर ही कीड संपुर्ण भारतात पसरायला वेळ लागणार नाही.

Sunday, September 11, 2011

होय,मला बदल हवा आहे.

विशाल अशा खंडप्राय भारत देशात आजकाल फुटीरतेचे वारे वाहू लागले आहेत.प्राचीन कालखंडात जगातील सर्वात सुखी व संपन्न मुलूख असलेल्या आपल्या देशाची आजची अवस्था अत्यंत विदारक अशी बनली आहे.

बांग्लादेशी,पाकिस्तानी घुसखोर देशाच्या विविध भागात अगदी आरामात राहत आहेत.मताच्या राजकारणासाठी मतलबी राजकीय पक्षांनी त्यांना रेशनकार्डासह सर्व सुविधा पुरविल्या आहेत.याच लोकांना हाताशी धरून परकीय आतंकवादी संघटना देशभरात उच्छाद मांडत आहेत.पुर्वेकडील राज्यामध्ये बांग्लादेशी घुसखोरांचा प्रश्न गंभीर आहे,त्यातच चीन सारखे साम्राज्यवादी देश सीमेभोवती आपला पाश आवळत आहेत.पण कुणाला याची फीकिर आहे?.

भारतीय मिडिया क्रिकेट,बॉलिवुड किंवा एखाद्य़ा राजकारण्याची बातमी देण्यात धन्यता बाळगत आहे.
काही लोक सोडले तर बहुतेक  राजकारणी गेंड्याची कातडी पांघरून फक्त आपला व आपल्या पुढील पिढीचा विचार करत आहेत.मनाला वाटते हे कधी बदलणार आहे की नाही,आपल्या देशाला पुर्वी सारखे वैभव प्राप्त होणार आहे की नाही?.

आज भष्ट्राचार,आतंकवादी हल्ले,गरिबी या मुद्यांनी देश होरपळून गेला आहे.भारतमाता आजच्या तरूण युवकांकडे मोठ्या आशेने पाहात आहे कारण उद्या तेच बदल घडविणार आहेत. .........

Thursday, August 25, 2011

छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजीराजें यांचे निष्ठावंत मुस्लिम सेनानी

छत्रपती शिवरायांचा लढा मुस्लीम धर्माविरूध्द नसून जुलमी इस्लामी राजसत्तेशी होता,दुर्दैवाने आज शिवरायांच्या नावाचा वापर हिंदू-मुस्लीम असे दंगे घडविण्यासाठी होतो.आपण सर्वांनी खरा इतिहास समजून घेतला पाहिजे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात धर्माला स्थान नव्हते.छत्रपती शिवरायांनी अफजलखानाचा वध केला पण त्याची समाधीही प्रतापगडाच्या पायथ्याला बांधली.काही अतिविद्वान इतिहासकारांनी,ज्यांनी आपल्या इतिहास लेखनात संभाजीराजेंची बदनामी केली,अशा इतिहासकारांनी संभाजीराजेंच्या मृत्युचे भांडवल करून संभाजीराजेंनी हिंदू धर्मासाठी प्राण सोडिला असे लिहून संभाजीराजेंना धर्मवीर ठरविले.ज्याला इतिहासात कोणताही पुरावा नाही.वास्तविक छत्रपती संभाजीराजेंनी स्वराज्यासाठी बलिदान केले होते.छत्रपती शिवराय,छत्रपती संभाजीराजें यांना धर्माच्या बंधनात अडकवून काही राजकारणी मंडळी व इतिहासकार त्यांचे महत्व कमी करत आहेत.आज महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील लढ्यात छत्रपती शिवरायांचे नाव वापरून ही मंडळी छत्रपतींना महाराष्ट्रात बंदिस्त करू पाहात आहेत,या मंडळीना माहीत नाही की कर्नाटक ही मराठ्यांची जहागीर होती.छत्रपती शिवराय,छत्रपती संभाजीराजें यांच्या सैन्यात अनेक निष्ठावंत मुस्लीम सैनिक होते,याची माहिती आपण पुढे सविस्तरपणे घेणार आहोत.

छत्रपतींच्या जीवाला जीव देणारे अनेक मुस्लिम सरदार स्वराज्यात होते.नूरखान बेग हा पायदळाचा प्रमुख होता.सिद्दी अंबर वहाब हवालदार याने(जुलै १६४७)मध्ये कोंढाणा सर करताना मोठा पराक्रम गाजवला.सिद्दी इब्राहिम हा छत्रपती शिवरायांचा अंगरक्षक होता,अफजलखानाच्या भेटीच्या वेळी तो छत्रपती शिवरायांचा अंगरक्षक होता(१९ नोव्हेंबर १६५९),फोंड्याचा लढाईवेळी त्याने पराक्रम गाजविला(एप्रिल १६७५)आणि त्यावर स्वराज्याचे निशाण फडकावले.सिद्दी हिलाल हा घोडदळात अधिकारी होता,पन्हाळगडाच्या वेढ्यात(२ मार्च १६६०)त्याने शिवरायांच्या सुटकेसाठी मोठा पराक्रम गाजविला,तसेच उमराणीजवळ बहलोल खानाविरूध्द झालेल्या लढाईत(१५ एप्रिल १६७३)तो होता.नेसरीजवळ बहलोल खानाशी झालेल्या युध्दात प्रतापराव गुजराबरोबर मारल्या गेलेल्या सात वीरात सिद्दी हिलाल होता.

सिद्दी वाहवाह(सिद्दी हिलालचा पुत्र)हा घोडदळातील सरदार होता,पन्हाळगडाला सिद्दी जोहरशी झालेल्या लढाईत तो जखमी झाला(दि.२ मार्च १६६०).मदारी मेहतर हा छत्रपतींचा विश्वासू सेवक होता.आग्र्याच्या बंदोबस्तातून महाराजांना सुटतेवेळी याची मोठी मदत झाली(१७ ऑगस्ट १६६६).काझी हैदर हा छत्रपती शिवरायांचा वकील होता(सन १६७०-१६७३).हुसेनखान मियाना याने मसौदखानाच्या कर्नाटकातील प्रांतावर हल्ला करून बिळगी, जामखिंड, धारवाड आदि प्रांत जिंकला(मार्च १६७९).रुस्तमेजनमा हा महाराजांना विजापूर दरबाराच्या गुप्त बातम्या पाठवण्याचे काम करीत असे,हुबळीच्या लुटीच्या वेळी त्याने मोठी कामगिरी पार पाडली(६ जानेवारी १६६५).दर्यासारंग हा मराठी आरमाराचा पहिला सुभेदार होता.त्याने मायनाक भंडारीसोबत खांदेरीवर(सन १६७९)विजय मिळवला.तर संभाजीराजेच्या कालात बसनूर(जानेवारी-फेब्रुवारी १६८५) लुटले. दौलतखान, इब्राहीम खान,सिद्दी मिस्त्री या आरमारातील अधिकार्‍याने खांदेरी(१६७९) आणिसंभाजीराजेंच्या बसनूरच्या(जानेवारी-फेब्रुवारी १६८५)मोहिमेत मोठा पराक्रम केला.सुलतान खान हा सुभेदार पोर्तुगीजांकडून दारुगोळा मिळवण्यात यशस्वी झाला होता.इब्राहिम खान हा मराठ्यांच्या तोफखान्याचा प्रमुख होता.त्या काळात तोफखान्यातील सर्व गोलंदाज (तोफची) मुस्लीम होते.विजापूर आणि गोवळकोंड्यावरुन स्वराज्यात आलेल्या ७०० पठाणी पायदळ आणि घोडदळाने स्वराज्याची निष्ठापूर्वक सेवा केली.

छत्रपतीच्या काळात असे अनेक निष्ठावंत मुस्लीम सैनिक होते ज्याची माहिती आपणास ज्ञात नाही.हे लिहिण्याचे प्रयोजन एवढ्याचसाठी की आपण छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजीराजेंना धर्माच्या बंधनात,भाषेच्या बंधनात अडकवून,या राष्ट्रपुरूषांचे महत्व कमी करू नये.छत्रपतींचे विचार आपण आचरणात आणावेत.त्यांच्या विचारांशी प्रतारणा करू नये.

Monday, June 13, 2011

राष्टकुल,आदर्श,स्पेक्टम घोटाळा व मीडियाचा प्रामाणिकपणा

सन 2010-11 हे  घोटाळ्याचे वर्ष म्हणून भारतीय इतिहासात गणले जाईल. पहिला काही हजार कोटीचा राष्ट्रकूल घोटाळा उघडकीस आला.इलेक्टॉनिक्स आणि प्रिंट मीडियामध्ये या घटनेबद्दल वार्तालाप चालू झाला.ही घटना संपण्यापूर्वीच आदर्श घोटाळा उघडकीस आला,ज्यामध्ये सैनिकांच्या कुटूंबियासाठी साठी राखीव असलेल्या भूखंडावर राजकारणी व सरकारी बाबूंनी संगतमताने डल्ला मारला.हा विषय मीडियामध्ये चघळला जात असताना लाखो कोटी रूपयांचा स्पेक्टम घोटाळा उघडकीस आलो.पहिले दोन विषय बाजूला पडले मीडिया याच विषयावर बोलू लागले.

लोकसुध्दा काही दिवस या घोटाळ्यांची गोष्टीची चर्चा करतात व नंतर विसरून जातात.भारतीय इलेक्टॉनिक्स आणि प्रिंट मीडिया प्रामाणिक काम कधी करणार हाच मोठा प्रश्न आहे.
  
देशामध्ये सध्या नक्षली धूमाकुळ घालत आहेत.शेकडो पोलिसांचे बळी गेले आहेत याकडे मीडियाचे लक्ष नसते.चीन आपले साम्राज्यवादी पंख पसरत आहे,पाकिस्तान सतत कुरापत काढत असतो.पूर्वेकडे बांग्लादेशी घुसखोरांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.या महत्वाच्या विषयी चर्चा करण्याऐवजी भारतीय इलेक्टॉनिक्स आणि प्रिंट मीडियातील काही लोक पैसे घेऊन काम करतात(पेड न्युज)तसेच टी.आर.पी वाढावा यासाठी आपणांस हव्या तश्या बातम्या देतात.

देश्याच्या मुख्य प्रश्नावर चर्चा करण्याऐवजी भारतीय इलेक्टॉनिक्स आणि प्रिंट मीडिया आज पुर्णपणे भरकटला आहे आणि यापेक्षा मोठे दुदैव ते कोणते.